पुणे/फलटण: 'नर्चरिंग ब्रिलियन्स' या आपल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची दोन यशस्वी दशके पूर्ण करत, कमिन्स इंडिया लिमिटेडने (Cummins India) यंदा ५२० गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प सोडत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाने आजवर हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले असून, यामध्ये फलटणसह देशातील विविध औद्योगिक केंद्रांमधील तरुणांचा समावेश आहे.
कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी यंदा देशभरातून ९,६०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांमधून अत्यंत पारदर्शक आणि कठोर निवड प्रक्रियेनंतर ५२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्या बॅचमध्ये २० दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा कंपनीचा उद्देश यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेल्या २० वर्षांत 'नर्चरिंग ब्रिलियन्स'ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ३,१०० हून अधिक विद्यार्थ्यांना सक्षम केले आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे यामध्ये ५२ टक्के विद्यार्थिनींचा सहभाग आहे. महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचे काम या माध्यमातून झाले आहे.
हा उपक्रम केवळ फी भरण्यापुरता मर्यादित नाही. अभियांत्रिकी शिक्षणासाठी लागणारे शुल्क, पुस्तकांचा खर्च आणि इतर शैक्षणिक गरजा भागवण्यासोबतच:
पुण्यातील कमिन्स इंडिया कॅम्पसमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्वेता आर्या आणि आशिष अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना श्वेता आर्या म्हणाल्या, "शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्या देशातील तरुण प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास, ते उद्याचे नवप्रवर्तक आणि नेते म्हणून समोर येतील."
२००६ मध्ये अवघ्या १३ विद्यार्थ्यांपासून पुण्यात सुरू झालेला हा प्रवास आज देशभर विस्तारला आहे. पुणे, फलटण, अहिल्यानगर, इंदूर, जमशेदपूर, धाराशिव, विदिशा, गुना आणि रांची अशा अनेक शहरांमधील तरुण अभियंत्यांना कमिन्सच्या या उपक्रमाचा आधार मिळत आहे.
कमिन्स इंडियाच्या या उपक्रमामुळे फलटण परिसरातील अनेक गुणवंत परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्याही अडथळ्याविना आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
शिक्षण, जिद्द आणि योग्य पाठबळ यांचा सुरेख संगम म्हणजे कमिन्सचा 'नर्चरिंग ब्रिलियन्स' उपक्रम!