फलटण (प्रतिनिधी): कोळकी (ता. फलटण) येथील बुद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका आयोजित १० दिवसीय 'श्रामणेर शिबिरा'ची अत्यंत उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात सांगता झाली. भंते धम्मानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली २८ एप्रिल ते ७ मे २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात सहभागी युवकांना धम्म, शिस्त, करुणा, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ९ उपासकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोरोची गावच्या ३ युवकांचा आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यातील ६ युवकांचा समावेश होता. शिबिराच्या अंतिम दिवशी भंते धम्मानंद बोधी यांनी बौद्ध परंपरेनुसार 'सिक्खा पच्चक्खान' (संघातून निवृत्ती) संस्कार विधी पूर्ण करून शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप केले.
१. संघटन मजबूत करा - आयु. दादासाहेब भोसले
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तथा राज्याचे संघटक आयु. दादासाहेब भोसले यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, "फलटण तालुक्यातील ज्या गावांमध्ये अजून भारतीय बौद्ध महासभा पोहोचलेली नाही, तिथे धम्माचा प्रचार करणे ही आपली जबाबदारी आहे. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रबोधन आणि प्रत्येक गावात शाखा व समता सैनिक दलाचे संघटन उभे राहणे काळाची गरज आहे." त्यांनी आगामी काळात २४ धम्म शिबिरांचे आयोजन करण्याचे ध्येय मांडले.
२. धम्म ही वैज्ञानिक जीवनपद्धती - आयुनि. सुजाता गायकवाड
सातारा जिल्हा पूर्व महिला अध्यक्षा सुजाता गायकवाड यांनी धम्मपदातील गाथांचा संदर्भ देत मनाच्या शुद्धतेचे महत्त्व पटवून दिले. "धम्म ही केवळ पूजा-अर्चा नसून ती जगण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. शुद्ध मनाने केलेली कृती सुखाकडे नेते," असे त्यांनी नमूद केले.
३. प्रज्ञेला महत्त्व द्या - आयु. श्रीमंतराव घोरपडे
केंद्रीय शिक्षक आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, भगवान बुद्धांनी अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला महत्त्व दिले आहे. शिबिरात घेतलेले संस्कार आता गावोगावी पोहोचवणे आवश्यक आहे.
फलटण तालुका अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिराच्या यशाचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक श्रमाला दिले. तालुका संघटक श्रीनिवास धाईंजे यांनी प्रांजळपणे नमूद केले की, "जरी शिबिरार्थींची संख्या कमी असली, तरी आम्ही शिबिराची 'क्वालिटी' (गुणवत्ता) उत्तम राखण्यावर भर दिला. अनेक अडचणींवर मात करून आम्ही हे कार्य सिद्धीस नेले."
या सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, अर्जुन ननावरे, शिवाजी सावंत, अरुण गायकवाड, तालुका सरचिटणीस केशव ठोंबरे, दादा कांबळे, भिकू भोसले, अरविंद निकाळजे, ज्येष्ठ कार्यकर्त्या कांताताई काकडे, विजय लोंढे, धीरज मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने धम्मप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सरचिटणीस आयु. केशव ठोंबरे यांनी केले. बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करून 'सरणतय' पठाणाने शिबिराची अधिकृत सांगता झाली.