सातारा दि.30 : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगाम 2021 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून जास्ती-जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरुन पिककापणी करुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे, असेही श्री. काळे यांनी कळविले आहे.