वाळू घाटाच्या अनुषंगाने नागरिकांना अभिप्राय व सूचना नोंदविण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
सातारा दि.17- सातारा जिल्हयातील सन 2025-2026 मधील प्रस्तावित वाळूगटांना पर्यावरण ना हरकत दाखला मिळणेकामी राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे पर्यावरण अनुमती मिळण्यासाठी अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील लिलावाकरिता पात्र वाळू गटांचे क्षेत्र निश्चित करण्यात आले असून उपलब्ध साधनांच्या आधारे जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल, मंत्रालय नवी दिल्ली यांनी जानेवारी 2020 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू, रेती मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा सर्व्हेक्षण अहवालाचे प्रारुप जनतेच्या अवलोकनार्थ तसेच अभिप्राय व सुचना नोंदवण्याकरीता सातारा जिल्हयाचे www.satara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अहवालातील वाळू घाटाच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरीकांचे अभिप्राय, सुचना असल्यास तीन प्रतींसह गौणखनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे किंवा या कार्यालयाकडील miningofficersatara@gmail.com या ई-मेलवर 30 दिवसाच्या आत नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.