निसर्गाचा कोप! वाऱ्याच्या भीषण वेगाने लोखंडी स्ट्रक्चरसह पत्रे हवेत उडाले; गोशाळेचे अतोनात आर्थिक नुकसान!
तरडगाव (प्रतिनिधी): फलटण तालुक्याला बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि सुसाट सुटलेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढले. या निसर्गाच्या तांडवाचा भीषण फटका तरडगाव येथील 'भैरवनाथ गोपालन संस्थेच्या गोशाळेला' बसला आहे. वादळाचा वेग इतका भयानक होता की, गोशाळेच्या अवाढव्य शेडवरील भक्कम लोखंडी रचनेसह छताचे सर्व पत्रे पत्त्यांसारखे हवेत उडून गेले. यामुळे गोशाळेतील ८० पेक्षा अधिक मुकी जनावरे एका झटक्यात उघड्यावर आली असून त्यांच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या दुर्दैवी घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गोशाळा प्रशासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बुधवारी दिवसभर उकाडा जाणवत असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता वादळी वाऱ्याने रौद्ररूप धारण केले. वादळाचा पहिला तडाखा भैरवनाथ गोपालन संस्थेला बसला. वाऱ्याच्या एका मोठ्या झोताने गोशाळेच्या छताचे शेकडो पत्रे उखडून लांबवर फेकून दिले. काही ठिकाणी तर लोखंडी अँगल आणि खांबही वाकले. वादळ शमल्यानंतर संपूर्ण गोशाळा परिसरात केवळ मोडलेले लोखंडी तुकडे आणि छिन्नविच्छिन्न झालेले पत्रे विखुरलेले पाहायला मिळत होते.
या गोशाळेमध्ये लहान-मोठ्या गायी, बैल आणि इतर अशी मिळून ८० पेक्षा अधिक जनावरे आहेत. छताचे छत्रच हरवल्यामुळे या मुक्या जनावरांना कडक ऊन आणि अवकाळी पावसाचा सामना थेट अंगावर करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, गोशाळेत जनावरांसाठी साठवून ठेवलेला हजारो रुपयांचा सुका व ओला चारा, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक साहित्य उघड्यावर आल्याने आणि पावसामुळे भिजल्याने वाया गेले आहे.
रात्रीच्या वेळी या मुक्या जनावरांना हक्काचा आसरा मिळावा आणि हिंस्र प्राण्यांपासून सुरक्षा व्हावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि गोशाळा व्यवस्थापनाने तातडीने धाव घेतली. रात्रीच्या अंधारातच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.
परंतु, सध्या उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पार जात आहे, त्यातच पुन्हा अवकाळी पावसाचा पिवळा इशारा (Yellow Alert) देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या ८० पेक्षा अधिक गोवंशाचे रक्षण कसे करायचे? हा यक्षप्रश्न गोशाळा व्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे. या भीषण आपत्तीनंतर आता शासन, प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी या गोशाळेच्या पुनरुभारणीसाठी तातडीने आर्थिक व साहित्याची मदत करावी, अशी आर्त हाक तरडगाव परिसरातून दिली जात आहे.