कोळकी ग्रामपंचायत सदस्याच्या एका 'स्टेटस'ने उघड केला 'राजे गटा'चा महासंकल्प! धनुष्यबाणावर लढाई निश्चित!
फलटण (सातारा): नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आलेली असताना, फलटणच्या राजकारणातील सर्वात मोठा 'सस्पेन्स' अखेर दूर झाला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा 'राजे गट' आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे.
या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारे अत्यंत महत्त्वाचे 'संकेत' राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य आणि सोशल मीडिया प्रमुख अक्षय गायकवाड यांनी आज (सोमवारी) ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे दिले आहेत.
स्टेटसचा 'स्पष्ट' संदेश: अक्षय गायकवाड यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि शिवसेनेचे अधिकृत चिन्ह 'धनुष्यबाण' प्रदर्शित केले आहे. या 'स्टेटस'मुळे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील 'राजे गट' फलटण नगरपालिकेत 'धनुष्यबाण' या चिन्हावरच लढणार, या बातमीला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
रामराजेंनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी आणि आपल्या राजकीय वारसदारांना बळ देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या एका 'स्टेटस'मुळे फलटणच्या रामाच्या नगरीत आता शिंदे गट आणि राजे गटाच्या एकत्रित ताकदीचे नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे प्रतिस्पर्धी गटात प्रचंड खळबळ उडाली आहे.