फलटण:ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत यशनी नागराजन यांनी नुकतीच पंचायत समिती फलटण येथे भेट देऊन कामकाजाची सखोल पडताळणी केली. दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल देसाई व गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले उपस्थित होते.
नागराजन यांनी दौऱ्याची सुरुवात सकाळी ७:३० वाजता मौजे आळजापूर येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विकासकामांची व शालेय कामकाजाची पाहणी केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा पाहून समाधान व्यक्त करताना नागराजन म्हणाल्या की, आळजापूर गाव भविष्यात डॉक्टर-इंजिनिअर घडविणारे गाव ठरेल.
येथील ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, अंगणवाडी, बचत गट आणि मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचीही त्यांनी कडक तपासणी केली. तसेच पवार वस्ती शाळेलाही भेट दिली.
दौऱ्याच्या समारोपप्रसंगी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत एक मॅरेथॉन आढावा बैठक पार पडली. यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा सविस्तर लेखाजोखा घेण्यात आला.
महत्त्वाचा निर्णय: ज्या ग्रामपंचायतींची आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
या बैठकीस विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), तालुका वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता (बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे), बालविकास प्रकल्प अधिकारी, संपर्क अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.