फलटण (प्रतिनिधी): मकर संक्रांतीच्या रात्री सांगोला-अकलूज मार्गावर फळवणी (ता. माळशिरस) येथे झालेल्या विचित्र आणि भीषण अपघातात फलटणच्या एका तरुणासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर, तर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. चेतन पवार (रा. फलटण) आणि किसन सूर्यवंशी (रा. म्हसोबावाडी, भिगवण) अशी मृतांची नावे आहेत.
बुधवारी (ता. १४) रात्री फळवणी येथील आवताडे वस्तीजवळ उसाच्या ट्रॅक्टरला एका पिकअप गाडीने धडक दिली होती. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, अपघातामुळे ही पिकअप गाडी रस्त्याच्या मध्यभागी थांबली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि चालक तेथे चर्चा करत असतानाच, कोळेगावकडून येणाऱ्या एका भरधाव दुधाच्या टँकरने थांबलेल्या पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, तेथे उभे असलेले अनेक जण वाहनांच्या मध्ये चिरडले गेले. यामध्ये फलटण येथील चेतन पवार याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात फळवणी येथील भाग्यवंत आवताडे आणि हनुमंत आवताडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. इतर १० जखमींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
वेळापूर पोलिसांनी टँकर चालक शिवाजी विद्यापन (रा. तमिळनाडू) याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. फलटणच्या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.