फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, आता चक्क वीज वितरण कंपनीच्या डीपीवर डल्ला मारण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. वाठार निंबाळकर येथे डीपीमधील तेल सांडून सुमारे २० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठार निंबाळकर येथील नाळे डीपी क्रमांक ११३१८६४ (६३ केव्हीए) या ट्रान्सफॉर्मरला चोरट्यांनी लक्ष्य केले. ही घटना १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.०० ते १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी प्रथम डीपीमधील सुमारे ८० लिटर ऑईल काढून टाकले आणि त्यानंतर आतील अंदाजे २० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या.
या चोरीमुळे महावितरणचे सुमारे ३० हजार रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी दत्तात्रय भानुदास शेळके (वय ४३, रा. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तपासाची चक्रे फिरली:
अज्ञात चोरट्यांविरुद्ध वीज चोरी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार खाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.