सातारा:
देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा मानाचा 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सातारा येथे १५ मे रोजी पार पडलेल्या या सोहळ्याला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी आता 'इंधनदाता' व्हावे: नितीन गडकरी
पुरस्काराला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी भविष्यातील भारताच्या प्रगतीचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले, "हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'ऊर्जदाता' आणि 'इंधनदाता' बनावे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग महत्त्वाचे आहेत."
वाहतूक क्षेत्रातील क्रांती आणि महत्त्वाच्या घोषणा:
१००% इथेनॉल वाहने: देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यावर येतील. यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन आयातीचा खर्च वाचणार आहे.
वेळेची बचत: पुणे-सातारा प्रवास आता अवघ्या एका तासात, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल.
रस्ते प्रकल्प: येत्या तीन वर्षांत देशातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्लास्टिकचा वापर: देशात लवकरच 'वेस्ट प्लास्टिक'पासून रस्ते बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती आणि जलसंधारणावर भर
नितीन गडकरी यांनी शेती विकासासाठी पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. "पाणी हीच खरी संपत्ती असून जलसंधारणावर लक्ष दिल्यास शेती अधिक फायदेशीर ठरेल. लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातही बायो-इंधनाचा वापर सुरू होईल, ज्यामुळे भारत इंधन निर्यात करणारा देश बनेल," असे प्रतिपादन त्यांनी केले.