फलटण (प्रतिनिधी) – एकेकाळी ढोल-ताशांच्या गजरात, जंगी मिरवणुका आणि भव्य देखाव्यांनी दुमदुमणारी हनुमान जयंती यंदा मात्र फलटण शहरात मर्यादित स्वरूपात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमाजी नाईक चौक, जबरेश्वर मंदिर परिसरासह शहरातील काही ठिकाणी भोजन कार्यक्रम झाले, मात्र पूर्वीसारखा उत्साह आणि गर्दी यावेळी जाणवली नाही.
पूर्वी दत्तनगर आणि मंगळवार पेठ येथून निघणाऱ्या भव्य मिरवणुका हे या सणाचे मुख्य आकर्षण असायचे. मागील काही वर्षांत तर चार-चार ठिकाणी हनुमान जयंती साजरी होत होती. वेगवेगळ्या चौकांत साऊंड सिस्टीम, देखावे, मूर्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण फलटण तालुका या उत्सवात रंगून जात होता. आई-वडील आपल्या मुलांना घेऊन मोठ्या उत्साहात जयंती पाहण्यासाठी येत असत.
मात्र यावर्षी चित्र पूर्णतः बदललेले दिसले. रामराजे शॉपिंग सेंटरसमोर एकाच ठिकाणी साऊंड लावून जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती संपूर्ण तालुक्याची नसून एका चौकापुरती मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हनुमान जयंती हा विशेषतः वडार समाजाचा प्रमुख सण मानला जातो. वर्षातून एकदाच येणाऱ्या या उत्सवात संपूर्ण समाज एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत असतो. मात्र यंदा ही एकजूट दिसून आली नाही, ही बाब चिंतेची ठरत आहे.
“पूर्वी आम्ही संपूर्ण कुटुंबासह जयंती पाहायला जात होतो. आता मात्र उत्साहच उरलेला नाही,” अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. समाजातील काही जणांच्या मते, अंतर्गत मतभेद, पक्षीय वाद किंवा आयोजनातील अडचणी यामुळे यंदा जयंती मर्यादित झाली असावी. मात्र यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, फलटणमधील इतर समाज मात्र एकत्र येत सण साजरे करताना दिसत आहेत. सर्व पक्ष आणि गट एकत्र येऊन एकतेचा संदेश देत असताना वडार समाजात मात्र विखुरलेपणाचे चित्र दिसत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
“वाद-विवाद विसरून किमान या एका दिवसासाठी तरी समाज एकत्र यावा आणि हनुमान जयंती पूर्वीसारख्या उत्साहात साजरी करावी,” अशी अपेक्षा वडार समाजातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
येत्या वर्षी तरी फलटणात पुन्हा एकदा जंगी मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर आणि एकतेचा संदेश देणारी हनुमान जयंती पाहायला मिळेल का? असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.