फलटण (प्रतिनिधी) | फलटण नगरपालिका निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज आपली ताकद दाखवत नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग क्रमांक १३ साठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी अर्ज दाखल करताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. या महत्त्वाच्या क्षणी फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
विकासाच्या मुद्द्यांवर भर
काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर भक्कम भूमिका मांडण्याचा संकल्प केला आहे. सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी ही फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
सामाजिक कामांमुळे प्रभागात मजबूत पकड
उमेदवार सचिन सूर्यवंशी यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव काम केले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची प्रभागात चांगली पकड निर्माण झाली आहे. याच जनसंपर्गाच्या जोरावर ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.