फलटण (प्रतिनिधी): येथील राजकारणातील एक युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अमोल दशरथराव सस्ते (शिवसेना-राजे गट) यांनी आज फलटण पंचायत समितीच्या उपसभापती पदाचा पदभार अत्यंत उत्साही वातावरणात स्वीकारला. यावेळी राजे गटाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने फलटणमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.
पदभार स्वीकारण्याच्या या सोहळ्याला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबतच फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक मा. युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्यासह राजे गटाचे सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाबाजीने पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल सस्ते भावूक झाले होते. त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट करताना सांगितले की,
"शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही संधी मिळाली आहे. तसेच पालकमंत्री ना. शंभूराज देसाई साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा) आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन."
अमोल सस्ते यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रशासनावर पकड आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे पंचायत समितीच्या कामाला आता नवी गती मिळेल, असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.