फलटण: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली समजावी आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने येथील मुधोजी महाविद्यालयात 'अभिरूप संसदेचे' (Mock Parliament) यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), राज्यशास्त्र विभाग, निवडणूक साक्षरता क्लब व संवैधानिक मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
श्रद्धांजलीने झाली सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृहात त्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या सार्वजनिक कार्याचा, प्रशासकीय कौशल्याचा आणि राज्याच्या विकासातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
संसदेचे कामकाज आणि चुरशीची चर्चा
या अभिरूप संसदेत एकूण ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सत्ताधारी पक्षाचे १७ मंत्री आणि विरोधी पक्षाचे ११ सदस्य अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली होती.
सभापती: वेदांत मोरे
पंतप्रधान: मयुरी फडतरे
विरोधी पक्षनेते: जय जाधव
सभागृहात देशाची सुरक्षा, महिला सुरक्षा, बेरोजगारी, महागाई आणि महिला व बाल सुरक्षा विधेयक यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रश्नोत्तर तास आणि पूरक प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संसदेतील वातावरणाचा अनुभव घेतला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी लोकशाही मूल्यांची जोपासना आणि संविधानिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे, कला शाखा प्रमुख डॉ. ए. एन. शिंदे, विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन
हा उपक्रम प्रा. गिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रा. प्रियांका शिंदे यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्देसूद विचार आणि तार्किक प्रतिवाद यामुळे उपस्थितांची वाहवा मिळवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे थेट शिक्षण मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.