मुख्यमंत्र्यांना साकडे: 'पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी संजीवराजेंना संधी द्या'
फलटण (प्रतिनिधी):
महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता फलटणच्या राजकारणातून एक मोठी मागणी समोर आली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी देऊन शिवसेनेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मुंबईला पाठवावे, अशी आग्रही मागणी फलटणमधील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संजीवराजेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास
निवेदनात म्हटले आहे की, श्रीमंत संजीवराजे यांनी अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार फलटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्याचेच फळ म्हणून नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवले. जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत ८ आणि नगर परिषदेत ९ जागा जिंकून त्यांनी तालुक्यात शिवसेनेचा भगवा भक्कमपणे फडकवला आहे.
विकासकामांचा ३५ वर्षांचा 'रिझल्ट'
केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारणातही संजीवराजेंचा दबदबा आहे. त्यांच्या कार्याचे प्रमुख मुद्दे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहेत:
राष्ट्रीय गौरव: त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेने देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
शेतकरी हित: कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे आणि खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न निकाली काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
शिक्षण आणि रोजगार: फलटण एज्युकेशन सोसायटी आणि 'गोविंद मिल्क'च्या माध्यमातून हजारो तरुण आणि महिलांना त्यांनी प्रगतीची दिशा दाखवली.
पश्चिम महाराष्ट्रासाठी 'हुकमी एक्का'
कार्यकर्त्यांच्या मते, संजीवराजे यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यास केवळ फलटण तालुकाच 'शिवसेनामय' होणार नाही, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पक्षाला एक मोठा आणि अनुभवी चेहरा मिळेल.
राजघराण्याचा वारसा आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे संजीवराजे या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे सांगत, आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.