फलटण (प्रतिनिधी):
येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा उद्या, सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या सभेमध्ये कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा आणि निर्णय होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
'जवाहर'सोबतचा भागीदारी करार रद्द होणार?
सभेसमोरील मुख्य विषयानुसार, हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील 'कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड' यांच्यासोबत दि. ०१ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
कारखाना खासगी अथवा सहकारी तत्त्वावर चालवणार
याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या दि. ०८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ‘Expression of Interest (EOI)’ प्रक्रियेद्वारे श्रीराम कारखाना, अर्कशाळा (Distillery) तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी अथवा खासगी तत्वावर चालविण्यास देण्याबाबतही या सभेमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
केवळ सभासदांनाच प्रवेश; चोख पोलीस बंदोबस्त
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व अधिकृत सभासदांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही विशेष सर्वसाधारण सभा केवळ वैध सभासदांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून, सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाहेरील व्यक्तीला सभास्थळी प्रवेश दिला जाणार नसल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सभास्थळी शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने पोलीस खात्याकडे चोख बंदोबस्ताची मागणी केली असून तसे पत्रही दिले आहे. सभेच्या ठिकाणी विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे.
विशेष सूचना (गणपूर्ती नियम):
कारखान्याने दिलेल्या सूचनेनुसार, जर निश्चित वेळेत गणपूर्ती (कोरम) अभावी सभा तहकूब झाली, तर ती त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने (दुपारी १:३० वाजता) घेण्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांदा सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.