फलटण (प्रतिनिधी): शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून फलटण नगरपरिषदेच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराविरोधात आता लोकप्रतिनिधींनीच आक्रमक पाऊल उचलले आहे. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याच जनक्रोधाची दखल घेत फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. विशाल उमा उदय तेली यांनी पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना थेट लेखी इशारा देत, पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फलटण नगरपरिषदेसमोर उपोषण करण्याचा सणसणीत इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरातील तेली गल्ली, रंगारी महादेव मंदिर परिसर, कैकाड गल्ली आणि ब्राम्हण गल्ली या प्रमुख भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत आणि अपुरा होत आहे. वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने येथील महिला व नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांचा हाच संताप नगरसेवक विशाल तेली यांनी थेट प्रशासनासमोर मांडला आहे. मुख्यधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, "तेली गल्ली, रंगारी महादेव मंदिर, कैकाड गल्ली, ब्राम्हण गल्ली येथे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. तरी पाणी पुरवठा वेळेवर न झाल्यास मी फलटण नगरपरिषद, फलटण समोर येथे उपोषणास बसणार आहे. त्याचे होणाऱ्या परिणामास आपण स्वतः सर्वस्वी जबाबदार राहाल, कृपया याची नोंद घ्यावी."
या पत्रावर फलटण नगरपरिषदेच्या बारनिशी लिपिकाची सही आणि १५ मे २०२६ ची अधिकृत पोहोच (रिसीव्हिंग) मिळाली असून, आता पालिका प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधीनेच थेट पालिकेच्या दारात उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यामुळे फलटण पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार आणि प्रशासनाला त्यांची जबाबदारी झटकू देणार नाही," अशी आक्रमक भूमिका नगरसेवक विशाल तेली यांनी घेतली आहे.
आता या सणसणीत इशाऱ्यानंतर तरी पालिका प्रशासन सुधणार की नगरसेवकाला नागरिकांसाठी खरोखरच उपोषणाचे हत्यार उपसावे लागणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र, या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न चांगलाच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.