दोन बालकांना उडवले, इर्टिगा फोडत जमावाने मद्यधुंद पोलिस निरीक्षकाला दिला चोप
फलटण : मद्यधुंद अवस्थेतील एका पोलिस निरीक्षकाने बालकांना उडवले. या घटनेत जखमी झालेल्या बालकांना रूग्णालयात भरती करण्यात आले.
यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद पोलिस निरीक्षकाला चोप देत दवाखान्याचा रस्ता दाखवला आहे तसेच त्याची मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा चारचाकी फोडण्यात आली जखमी पोलिस अधिकाऱ्याला फलटण येथील निकोप हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री फलटण शहरातील दत्तनगर येथे घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्यातून नुकतीच बदली झालेले पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी काल (शनिवार) दि. 3 जून रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील दत्तनगर येथे मद्यधुंद अवस्थेत बालकांना उडवले. या घटनेनंतर नागरिकांनी संशयिताला थांबवले. यावेळी कारमध्ये दारू रेचत असल्याचे समोर आल्याने त्याला संतप्त जमावाने चोप दिला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जखमी मुलांना रुग्णालयात हलवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.